अश्विनला पद्मश्री तर श्रीजेशचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव   

राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते गौरव 

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी (२८ एप्रिल) राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात त्याला हा पुरस्कार प्रदान केला. क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल अश्विनला हा सन्मान देण्यात आला आहे.
 
अश्विनसह इतर अनेक खेळाडूंनाही पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये हॉकीपटू आर. श्रीजेशच्या नावाचाही समावेश आहे. या सत्कार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. हा पुरस्कार मिळवणारा अश्विन हा ४०वा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी हा पुरस्कार झहीर खान, सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर यांच्यासह अनेक खेळाडूंना देण्यात आला आहे. गुरचरण सिंग यांना २०२३ मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
अश्विन हा भारतासाठी क्रिकेट खेळणारा महान भारतीय फिरकी गोलंदाज आहे. गेल्या वर्षी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या बॉक्सिंग डे कसोटीनंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. अश्विन सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये खेळत चेन्नई सुपर किंग्ज सोबत आहे.
 
श्रीजेश यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पीआर श्रीजेश यांना पद्मभूषण हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या वर्षी हॉकीतून निवृत्त झालेल्या या महान हॉकीपटूला भारतीय हॉकी इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू म्हणून ओळखले जाते. भारताला पुरुष हॉकीमध्ये सलग दोन ऑलिम्पिक पदके जिंकून देण्यात श्रीजेशने महत्त्वाची भूमिका बजावली.

अश्विनची कारकीर्द

३८ वर्षीय अश्विनने डिसेंबर २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. अश्विनने भारतासाठी १०६ कसोटी, ११६ वनडे आणि ६५ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याने १०६ कसोटी सामन्यांमध्ये ५३७ विकेट्स घेतल्या. अनिल कुंबळे (६९९ विकेट्स) नंतर तो भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने ११६ वनडे सामन्यांमध्ये १५६ विकेट्स आणि ६५ टी२० सामन्यांमध्ये ७२ विकेट्स घेतल्या. अश्विनने फलंदाजीनेही आपले कौशल्य दाखवले आणि कसोटीत ६ शतके आणि १४ अर्धशतकांसह ३,५०३ धावा केल्या. त्याने वनडे सामन्यांमध्ये ७०७ धावा केल्या.

Related Articles